TOD Marathi

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे पक्ष चिन्हाच्या बाबतचा निर्णय सोपवला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवत उद्धव ठाकरे यांना मशाल तर एकनाथ शिंदे यांना ढाल-तलवार हे चिन्ह दिलं. (Shinde group got new symbol from Election Commission).

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या चिन्हावर देखील आता बिहारमधील (Bihar) समता पार्टीने दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण अजून तापले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे, समता परिषदेने तक्रार केली आहे तर त्याचही आम्ही भांडवल करायचं का? काही झालं की शिंदे गटावर बोलायचं हे ठाकरे गटाने बंद करायला हवं. त्यांनी कोर्टात जावं, कुठेही जावं, काय करायचं ते करावं पण धनुष्यबाण हे चिन्ह आमचंच आहे, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उदय सामंतांनी ‘सामना’लाही निशाण्यावर घेतलं. ‘सामना’मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्या टीकेला प्रतिउत्तर देताना मी सामनाचे धन्यवाद मानतो कारण त्यांनी मान्य तरी केलं की मुख्यमंत्री आठवड्यातून एकदा तरी मंत्रालयात दिसतात. मात्र पूर्वीचे मुख्यमंत्री दिसत तरी होते का?, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.