TOD Marathi

Coronavirus च्या तिसऱ्या लाटेचा धोका ; Pune Municipal Corporation ने खाजगी रुग्णालयांना दिल्या ‘या’ सूचना

टिओडी मराठी, पुणे, 1 सप्टेंबर 2021 – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कधीही बेड ताब्यात घेतले जातील. त्यामुळे तयारीत रहा, असे पत्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पाठवले आहे.

महापालिकेने करोनाच्या याअगोदर दोन लाटांमध्ये सुमारे 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते. यावरआताही पालिकेने 50 टक्के बेड्स कोरोनासाठी राखीव ठेवण्याची तयारी ठेवली आहे. यापैकी 10 टक्के बेड्स हे लहान मुलांसाठी ठेवावेत, अशाही सूचना दिल्यात.

आपल्या पत्रात मनपाने असे म्हटलं आहे कि, कोविड 19 च्या तिसऱ्या लाटेत आढळून येणाऱ्या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आपले रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यास तसेच उपचारासाठी नकार न देता रुग्णालयात तातडीने दाखल करुन घ्यावे. जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना बेड्स अभावी उपचार मिळण्यास विलंब होणार नाही.

रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी. रुग्णांवरील उपचार व त्यांच्या बिलाच्या आकारणी संदर्भात तक्रारी उद्भवणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच कोविड 19 च्या तिसऱ्या लाटेचा वर्तवलेला अंदाज लक्षात घेता पुढील काळात विभागीय आयुक्त पुणे यांनी याअगोदर उपलब्ध करुन दिलेल्या डॅशबोर्डवर बेड्स उपलब्धतेबाबत माहिती सतत अद्ययावत ठेवावी, असंही पत्रात म्हटलं आहे.

कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेक उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार 5 सप्टेंबरला ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेमध्ये सहभागी होणार असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.

रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित करणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका तसेच घ्यावयाची काळजी, अशा विविध बाबींची माहिती घेईल.