टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 ऑगस्ट 2021 – ‘पेगॅसस’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकार दबाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा आज बैठक बोलावली. त्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेही सहभागी होणार आहेत. त्याअगोदर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
संसद, न्यायालय, प्रशासन आणि प्रसार माध्यमं कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचे सरकार ऐकालयला तयार नसेल तर, सर्वोच्च न्यायालय खिशात आहे, या भूमिकेत हे मोदी सरकार आहे. पेगॅससचा विषय गंभीर आहे, हे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर आणखी आम्ही न्यायासाठी कोणत्या दारात जायचं,? असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारला आहे.
संजय राऊत म्हणाले, १२ ते १३ दिवस विरोधी पक्ष या विषयावरती संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चेची मागणी करत आहे. सरकार आता ऐकायला तयार नाही. पण, आता सर्वोच्च न्यायालय सांगत आहे की, हा विषय गंभीर असेल तर चौकशी करणे आवश्यक आहे.
विषय गंभीर आहे की नाही? हे संसदेत चर्चा झाल्याशिवाय कसे कळणार?. विरोधी पक्षाकडे काय माहिती आहे?, सरकारकडे काय माहिती आहे?. त्यानंतर हा विषय किती गंभीर आहे?. याच्यावर आपल्याला निष्कर्ष काढता येईल. पण, सरकार सर्वोच्च न्यायलयाचेही ऐकत नसेल तर हे मोदी सरकार देशातले लोकशाहीचे चार स्तंभ मोडीत काढायला निघाले आहे, असेच म्हणावे लागेल,
या दरम्यान, विरोधक केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेत. मागील आठवड्यात दोन वेळा तर, बुधवारी कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांची विविध मुद्द्यांवर एकजुटीसाठी बैठक झाली आहे.
या रणनीतीचा भाग म्हणून शुक्रवारीही बैठक होणार आहे, असे सांगितले जाते. ‘युवा काँग्रेस’च्या वतीने गुरुवारी शेती कायदे, पेगॅसस आणि इंधन दरवाढ हे तीन मुद्दे घेऊन ‘संसद घेराव’ आंदोलन केले होते.