TOD Marathi

Sri Lanka Beats Pakistan, Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 स्पर्धेतील शेवटच्या (asia cup 2022 final) सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा तब्बल 23 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी चक्क लोटांगण घातलं. पाकिस्तानचा पूर्ण संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं सहाव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय. आशिया चषकाच्या इतिहासात चौथ्यांदा जेतेपदाच्या लढतीत श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ हे आमनेसामने आले होते. यापूर्वी या दोघांमध्ये तीनवेळा खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत श्रीलंकेने दोनदा तर, पाकिस्ताननं एकदा विजय मिळवला आहे.

श्रीलंकेच्या (Team Sri Lanka) संघानं दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानची (pakistan) सुरुवातच खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील चौथ्या चषकात कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्या रुपात संघाला २ मोठे धक्के बसले. मात्र, त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली होती. पण इफ्तिखार 31 चेंडूत 32 धावा करून आउट झाला. मोहम्मद नवाजही माघारी परतला. पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात हसरंगानं ३ विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या विजयाचा पायाच रचला. शेवटी पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक 55 धावांची खेळी करून दाखवली. श्रीलंकेकडून प्रमोद मादुशाननं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर, वानिंदु हसरंगाला ३ विकेट्स मिळाल्या. याशिवाय, चमिका करुणारत्नेनं दोन आणि महेश तीक्ष्णानं एक विकेट्स घेतली.

हसरंगा आणि राजपक्षे यांनी पाचव्या विकेटसाठी 36 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली होती. हसरंगा हा 21 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. पण भानुका राजपक्षे याने संघाची एक बाजू संभाळून ठेवली. त्यानं चमिका करुणारत्ने सोबत 31 चेंडूत 54 धावांची भागीदारी करत श्रीलंकेची धावसंख्या 170 धावांपर्यंत पोहचवली. भानुकानं नाबाद 71 धावांची खेळी केली आहे. ज्यात सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. चमिकानं 14 चेंडूत तब्बल 14 धावा केल्या. श्रीलंकेच्या संघानं शेवच्या 5 षटकात 53 धावा कुटल्या. पाकिस्तानकडून हरीस रौफनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाह, शादाब खान आणि इफ्तिखर अहमद यांना प्रत्येकी १-१ विकेट्स मिळाली.