TOD Marathi

देशभरात राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यामध्ये काँग्रेसने आपले दहा उमेदवार दिले आहेत, या दहा उमेदवारांमध्ये छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, रंजीता रंजन, हरियाणामधून अजय माकन, कर्नाटकमधून जयराम रमेश तर मध्य प्रदेशातुन विवेक तनखा, महाराष्ट्रातुन इम्रान प्रतापगढी, राजस्थानमधुन रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि तमिलनाडुतुन पी. चिदंबरम यांचा समावेश आहे. हे नेते निवडणुका लढवणार आहेत असं असलं तरी काँग्रेसमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरून नाराजी असल्याचं बोललं जातय.

त्याला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा आणि काँग्रेस नेत्या नगमा मोरारजी यांनी एक प्रकारे दुजोराच दिलेला आहे. राज्यसभा उमेदवारांची यादी घोषित झाल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा आणि मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षा तथा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकारी नगमा मोरारजी या दोघांचे ट्वीट चर्चेत आहेत. पवन खेरा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात
“शायद मेरी तपस्या मे कुछ कमी रह गई”

तर त्यांच्याच ट्वीटला रिट्विट करत नगमा मोरारजी लिहितात
“हमारी भी 18 साल की तपस्या कम पड गई इमरान भाई के आगे”

पुढे त्यांनी असंही लिहिलय कि
“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2003-2004 मध्ये व्यक्तिशः मला आश्वासन दिलं होतं. मी पक्षात सामील झाले तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो. त्याला आता अठरा वर्ष झालीत. श्री. इमरान यांना महाराष्ट्रातून राज्यसभेत सामावून घेतलं मी विचारते की मी कमी पात्र आहे का?”

अशा शब्दात जाहीर नाराजी नगमा मोरारजी यांनी व्यक्त केलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जाहीर नाराजी प्रकट करताना त्यांनी थेट इम्रान प्रतापगडी यांचं नाव घेतलेलं आहे. कारण इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा कायमच पक्षाची बाजू प्रभावीपणे गेली अनेक वर्षे माध्यमांसमोर मांडत आहेत, त्यासोबतच नगमा मोरारजी यादेखील काँग्रेसच्या नेत्या आहेत. महिला काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी काम केलेलं आहे.

खरतर महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठीही अनेक नेते मंडळी होती, त्यांनाही यामध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता या नाराजी नाट्यावर कसा पडदा पडतो किंवा या नाराज गटाची समजून कशी काढली जाते हे येणारी वेळ सांगेल.