TOD Marathi

नवी दिल्ली: आर्यन खानच्या अटकेवरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता त्याला धार्मिक रंगही दिला जात आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आर्यन खान अटकेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. फक्त आडनाव खान असल्याने केंद्रीय यंत्रणा २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली असल्याचे त्यांनी म्हणलं आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, चार शेतकऱ्यांच्या हत्येचा आरोपी असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कारवाई करुन उदाहरण देण्याऐवजी केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे. भाजपाच्या मतदारांना खूश करत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना टार्गेट केलं जातं ही न्यायाची विटंबना आहे.

ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी आज पुन्हा एकदा जामीन अर्ज सादर करण्यात आला मात्र यावर , १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे पुढील दोन दिवस पुन्हा एकदा आर्यन आणि अरबाज मर्चेंटला ऑर्थर रोड तुरुंगात रहावं लागणार आहे.