TOD Marathi

मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे सुपर सीएम आहेत का? (Is Shrikant Shinde super CM?) असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वर्पे (NCP Spokesperson Ravikant Varpe) यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी शेअर केलाय आणि श्रीकांत शिंदे यांना सुपरसीएम बनवल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा अशी खोचक टिप्पणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री बसतात त्याच खुर्चीत श्रीकांत शिंदे बसलेले आहेत, त्यांच्यापुढे काही फाईल्स आणि कागदपत्र देखील आहेत आणि नेमका हाच फोटो शेअर करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देत टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांवर कामाचा लोड आहे, त्यातच मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना कदाचित सुपर सीएम बनवलं असेल, त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना शुभेच्छा. असं म्हणत उपहासात्मक टीका श्रीकांत शिंदे यांच्यावर करण्यात आली आहे. आता या टीकेला शिंदे गटाच्या वतीने काय उत्तर देण्यात येतं ते पाहावे लागेल.