कोलकाता:
नशा मानवी शरीरासोबत जीवनालाही संपवते, आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात. आजची तरुण पीढी, महाविद्यालयातील विद्यार्थी ड्रग्ज व्यतिरिक्त व्हाईटनर, नेलपेंट, ऑईल पेंट, शाई अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत नशा करतात. पण पश्चिम बंगालमध्ये नशेचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधील युवक आता नशा करण्यासाठी फ्लेवर्ड कंडोमचा वापर करताना दिसत आहेत आणि यामुळे त्या ठिकाणी चक्क कंडोमचा तुटवडा निर्माण झाला आहे. या गोष्टीमुळे सर्वच जण चक्रावले आहेत.
तुम्हाला ऐकण्यासाठी हे विचित्र वाटेल पण हा प्रकार दुर्गापूरमध्ये सर्रास घडताना दिसतोय. तरुणांच्या या नशाबाजीमुळे दुर्गापूरमधील मार्केटमध्ये अचानक फ्लेवर्ड कंडोमची विक्री वाढली असून त्याचा आता तुटवडाही निर्माण होताना दिसत आहे.
कंडोमचा नशा कसा करतात?
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या ठिकाणी हा नशेचा प्रकार सध्या खूप फेमस झाला आहे. शहरातील युवक वेगवेगळ्या फ्लेवरचे कंडोम विकत घेतात, पुढे ते गरम, कडकडीत पाण्यात एक तासासाठी भिजवत ठेवतात आणि एक तासानंतर तेच पाणी पितात. या गोष्टीपासून नशा होत असून हा नशा जवळपास 10 ते 12 राहतो.
दुर्गापूरमध्ये आजूबाजूच्या अनेक ठिकाणांहून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. ते बहुतांशी हॉस्टेलवर राहतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये नशेचे प्रमाण मोठं आहे. सिगारेट आणि दारुची नशा करण्यासाठी पैसे लागतात. तुलनेत कंडोमची खरेदी कमी किमतीत होते, ते हाताळणेही सोपं राहतं. नशाबाजीसाठी कंडोमची खरेदी केली जाते ही गोष्ट अनेक दुकानदारांनी मान्य केली आहे, असं हिंदी वृत्त वाहिनी आज तक ने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात म्हटलं आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
फ्लेवर्ड कंडोमचा नशा करणे हे शरीराला घातक असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामध्ये विविध केमिकल्स वापरण्यात येत असल्याने त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.