टिओडी मराठी, दि. 7 जुलै 2021 – गुजरातमधील एका दुकानदाराला कॅरी बॅगचे 10 रुपये मागितले म्हणून 1500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अहमदाबाद येथील ग्राहक न्यायालयाने हा दंड सुनावलं आहे. त्यामुळे ‘जागो ग्राहक जागो’ अर्थात ग्राहकांचे हक्क, अधिकार आणखी सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.
गुजरातमधील अहमदाबाद इथल्या ग्राहक न्यायालयामधील ही घटना घडली. एका ग्राहकाने रिटेल स्टोअरमध्ये 2,846 रुपयांच्या साहित्याची खरेदी केली. खरेदी केलेले साहित्य ठेवण्यासाठी त्या व्यक्तिकडे बॅग नसल्याने त्याने दुकानदाराकडे बॅगेची मागणी केली. यावेळी दुकानदाराने बॅग मागितल्यामुळे या बॅगेवर 10 रुपयांचा चार्ज लावला.
पण, ग्राहकाने बॅगचे 10 रुपये देण्यास नकार देऊन बॅग मोफत मिळत नाही, असे ग्राहकाने विचारले. तेव्हा दुकानदाराने बॅग मोफत नाही असे सांगितले. मात्र, हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. ग्राहकाने या प्रकरणाची तक्रार ग्राहक न्यायालयात केली. त्यामुळे स्टोअरमालकाला ग्राहकाला व्याजासहित त्याचे पैसे परत करावे लागले.
ग्राहक न्यायालयाने 8 टक्के व्याजासह ग्राहकाला पैसे परत करण्याचे आदेश दिलेत. ग्राहक न्यायालयाने मानसिक छळासाठी 1000 रुपये आणि कायदेशीर शुल्कासाठी 500 रुपये देण्याचे निर्देश या किरकोळ दुकानदाराला दिलेत.
तसेच हे पैसे 30 दिवसांत ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय ज्या दिवसापासून हे प्रकरण न्यायालयात गेले त्या दिवसापासून 8 टक्के व्याज दुकानदाराला लावले आहे.
या ग्राहकाने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, ‘जेव्हा जेव्हा तो वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जातो तेव्हा दुकानात कुठेही असे नमूद केलेले नाही की, त्याला कॅरी बॅगेसाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. जर दुकानदाराला पैसे हवे असतील तर, त्याने कॅरी बॅगेचे पैसे द्यावे, असे स्टोअरमध्ये लिहायला हवे होते.’