मुंबई:
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे निर्माण झालेला संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हा पक्ष आपलाच असल्याचा दावा केला आहे. (Ekanath Shinde CM) यावरुन कायदेशीर वाद सुरु असतानाच आता विधिमंडळातील शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयातील कर्मचारी रविवारी सकाळपासून कार्यालयाबाहेरच बसून आहेत. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वादामुळे हे कार्यालयच सील करण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Shivsena)
आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. (First day of special session of Maharashtra Assembly) आज नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी शिवसेनेचे राजन साळवी आणि भाजपचे राहुल नार्वेकर यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीत मतदान कोणाला करायचे यासाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या प्रतोदांकडून दोन स्वतंत्र व्हिप जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आज नक्की कोणाचा व्हिप चालणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांनी सुनील प्रभू यांचा व्हिप शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल, असे म्हटले आहे. (Rajan Salvi MVA and Rahul Narvekar BJP) त्यामुळे मीच विधानसभा अध्यक्ष होईन, असा दावा साळवी यांनी केला. तर दुसरीकडे भरत गोगावेल यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना व्हिप जारी करून भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता यावरून कायदेशीर पेच उद्भवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास व्हिप वॉरमध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यापैकी कोणाचा विजय होणार, हे पाहावे लागेल.
तर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी एक वेगळाच दावा केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व्हिप लागू होत नाही. महाराष्ट्र विधिमंडळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही सदसदविवेकबुद्धीने केली जाते, असे मुनंगटीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांच्या मतदानावेळी नेमके काय घडणार, हे पाहावे लागेल.