टिओडी मराठी, मुंबई, दि. 27 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला आहे. नारायण राणे यांच्या अटकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची भूमिका आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे अनिल परब सध्या भाजपच्या रडारवर आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे नारायण राणे यांना अटक होण्यामागे अनिल परब यांचा हात आहे, असे बोलले जात आहे. त्यानंतर नारायण राणेंनी अनिल परब यांची सर्व प्रकरणं उकरुन काढणार आहे, असा इशारा दिला आहे.
मंत्री अनिल परब यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनाही अनिल परब यांच्या समर्थनात पुढे सरसावली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरीमध्ये अनिल परब यांच्या समर्थनार्थ एक बॅनर लावलेत.
शिवसेनेच्या कार्यकर्तानी जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग परिसरात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले. या बॅनरवर “संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात. अनिल परब साहेब, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.” असे लिहिलं आहे. राजू श्रीपाद पेडणेकर या शिवसेना नगरसेवकाने ही बॅनरबाजी केली असून सध्या हि बॅनरबाजी सोशल मीडियासह अनेक ठिकाणी चर्चेत आहे.