राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे असंच मिशन राज्यपालांचे आहे का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी शंका व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेला उल्लेख या सगळ्या गोष्टी असे सांगतात या पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते, त्याचे यत्किचिंतही स्मरण नसलेली व्यक्ती महाराष्ट्रात पाठवलेली आहे. असेही शरद पवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याबद्दल म्हणाले.राज्यपाल ही एक इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून त्यावर आतापर्यंत कोण बोलले नाही मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उल्लेख पाहिल्यानंतर राज्यपालांनी आता पार मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर काल त्यांचे कौतुक करणारे स्टेटमेंट आले आहे पण हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्यामुळे राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी त्यांचा निकाल घेतला पाहिजे आणि अशाप्रकारच्या व्यक्तीकडे जबाबदारी देणे योग्य नाही, असे मत शरद पवार यांनी मांडले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहे परंतु आम्ही बरीच वर्षे बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर गावे मागत आहोत. त्यामध्ये आमचे सातत्य आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल यावर चर्चा होऊ शकते मात्र काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही अशा शब्दात शरद पवारांनी (Sharad Pawar) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.
मी काही ज्योतिषी नाही त्यामुळे त्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही कारण अशा गोष्टीवर माझा विश्वास नाही. त्यामुळे मी जागा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लगावला. दुसर्या राज्यात निवडणूका म्हणून आपल्या राज्यात सुट्टया देण्याचा प्रघात यापूर्वी ५०-५५ वर्षात ऐकला नाही. गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय अशी शंका येणारी स्थिती आहे असेही शरद पवार म्हणाले. राज्यात आज शेतकरी अस्वस्थ झाला आहे. इतक्या संकटात पहिल्यांदाच सापडला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची राज्यसरकारची जबाबदारी आहे मात्र तशी ठोस पावले उचलताना सरकार दिसत नाही. या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने बघायची गरज असताना सरकार बघत नाही ही दु:खद बाब आहे, असेही शरद पवार म्हणाले.