TOD Marathi

राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या रोखठोक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही विषयाबाबत बच्चू कडूंच्या स्पष्ट मतांची आणि वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. त्यांचा असाच एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात बच्चू कडू एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढताना दिसत आहे. भुसावळमधील प्रांत कार्यालयात बच्चू कडू यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने गोरगरीबांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची विचारणा केली पण त्या योजनांची अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना संताप झाला. संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याना चांगलेच फैलावर घेतले.

“फुकटचा पैसा खायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला लाथच मारायला पाहिजे. लाज वाटली पाहिजे थोडी. ३५ हजारापैकी किमान १० हजाराचं तर काम करा. रोजगार हमी सांगतो, नालायका…!” अशा शब्दांता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अक्षरश: अधिकाऱ्यांना झापलेच. राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून बच्चू कडूंनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी चांगलंच फैलावर घेतलं. “फुकटचा पैसा खायला पाहिजे तुम्हाला. “तुम्हाला लाथच मारायला पाहिजे. लाज वाटली पाहिजे थोडी. ३५ हजारापैकी किमान १० हजाराचं तर काम करा. रोजगार हमी सांगतो, नालायका. गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही तुम्हाला. तो मेला तरी चालेल. नको होऊ दे १० वर्ष घर. तुमची काहीच तयारी नाही. कोणत्या वर्षात योजना सुरू केली तुम्ही?” अशा शब्दांत बच्चू कडू अधिकाऱ्याला सूनावताना दिसत आहे.

त्या दलितांवर का अन्याय करताय? खरंतर तुमच्यावर तर अॅट्रॉसिटीचाच गुन्हा दाखल करायला पाहिजे. रमाईमध्ये सरकारला टार्गेट पूर्ण करता येत नाही. एससी समाजातील लोकांसाठी ही रमाई योजना आहे. त्यांच्या योजनेचे प्रस्ताव वेगळे काढून त्याच्यासाठी वेगळे अर्ज मागवून घ्या.ते लगेच मंजूर होतील.त्यासाठी केंद्रसरकारच्या परवानगीची गरज नसते. कर्जाचा प्रस्ताव पाठवला की त्याला दोन दिवसात मंजुरी मिळते, समाज कल्याणचं कोण पाहातं हे माहिती नाही? अशी प्रश्नांनी बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांची खरडपट्टीच काढली.