मुंबई: 7प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे आज पुण्यात ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, “संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. त्यांना वाचनाचा छंदही अफाट होता”.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संजीवनी करंदीकर यांच्या निधनानंतर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
संजीवनी करंदीकर यांना काल संध्याकाळी दीनानाथ हॉस्पिटल दाखल केले होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याकडून करंदीकर कुटूंबियांचे फोनवरुन सांत्वन केले. करण्यात आले. ठाकरे कुटुंबीय त्यांच्या अंत्यसंस्काराला पुण्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर संध्याकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.