TOD Marathi

मुंबई: राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपने त्याला कडाडून विरोध करत, हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितल आहे. राज्य सरकारने मात्र त्याचं समर्थन केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वाईन विक्रीच्या निर्णयाचं स्वागत करताना वाईन म्हणजे दारू नसल्याचं म्हटलं होतं. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट राऊतांवरच आरोप केला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगासोबत संजय राऊत यांची पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच राऊतांनी आपले आरोप खोडून दाखवावेच असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात वाईन म्हणजे दारू नव्हे. मग वाईन म्हणजे काय आहे? राऊत साहेब वाईन म्हणजे काय आहे? आपला आणि वाईनचा संबंध काय? किरीट सोमय्यांचा आणि वाईनचा दमडीचाही संबंध नाही. मी आयुष्यात कधी अंडी खाल्ली नाही. बिडीही ओढली नाही. सिगारेट नाही. वाईन नाही आणि बियरही नाही. मग यासोबत तुमचा संबंध काय आहे. संजय राऊत कुटुंबाने काही महिन्यापूर्वी वाईन व्यवसायातील मोठ्या उद्योगपतीशी बिझनेस पार्टनरशीप सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सर्व सहकारी आणि ठाकरे सरकारचे कारनामे फक्त पैसे गोळा करणं आहे यासाठीच आहेत. महाराष्ट्राला मद्य राष्ट्र बनवायला निघाले आहेत. राऊतांनी सांगावं किती महिन्यांपूर्वी तुम्ही मॅगपी ग्रुप अशोक गर्ग यांच्या बरोबर बिझनेस पार्टनरशीप केली. राऊतांनी सांगावं त्यांची पत्नी आणि कन्या किती व्यवसायात ऑफिशियल पार्टनर आहेत. किती व्यवसायात जॉईंट व्हेंचर केलं आहे, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.
किरीट सोमय्या यांच्या या आरोपांवर आता संजय राऊत काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे.