TOD Marathi

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष मोठा होतो आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता उघडउघड ठाकरे सरकारविरोधात भूमिकाही घेतली आहे. यावर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली होती. बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा शरद पवारांनी दिला होता. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. राणेंच्या टीकेला आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आणि या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी सगळे प्रयत्न आपण करू, असं म्हटलं होतं. तसंच, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असंही म्हटलं होतं. शरद पवारांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर नारायण राणे यांनी ट्विट करत टीका केली होती.

“माननीय शरद पवार साहेब गुवाहाटीतील आमदारांना धमक्या देत आहेत. ‘सभागृहात येऊन दाखवा,’ असे सांगितले जात आहे. ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.”

असं राणेंनी म्हटलं होतं. राणेंच्या या ट्वीटनंतर आता संजय राऊत यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी सकाळीच एक ट्वीट केलं. महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल. पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये राऊतांनी पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केलं आहे.