TOD Marathi

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तीन दिवसापूर्वी ईडीने अटक केली होती. अटक केल्यानंतर 4 ऑगस्टपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज संजय राऊत यांची ही कोठडी संपणार आहे.

या प्रकरणावर आता कोर्टात सुनावणी सुरु आहे. संजय राऊत यांच्या ईडी कोठडीबाबत आता कोर्टात युक्तिवाद सुरू आहे.

या संदर्भात काही महत्त्वाची माहिती ईडीने कोर्टाला दिलेली आहे. त्यामध्ये अलिबागमधील 10 भूखंडांसाठी राऊतांनी तीन कोटी रोख दिले. तीन कोटींची रक्कम गुरु आशिष कन्स्ट्रक्शननं पुरवली. पत्राचाळ प्रकरणात गुरु आशिष कन्स्ट्रक्शन मुख्य आरोपी आहे. तपासात महत्त्वाची कागदपत्र मिळाले आहेत. अवैध मार्गाने एक कोटी 17 लाखांचा व्यवहार झाला आहे, यापूर्वी आम्हाला 1 कोटी 6 लाखांची माहिती मिळाली. राऊतांच्या पत्नीच्या खात्यावरून अनेकांना पैसे वळवण्यात आलेले आहेत. अशी माहिती ईडीच्या वतीने देण्यात आली आहे.

राऊतांशी व्यवहार झालेल्यांना चौकशीसाठी बोलावलंय. व्यवहाराबद्दल राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीने केला आहे.

कोठडीत आवश्यक व्हेंटिलेशन नसल्याने श्वसनाचा त्रास होतो, अशी तक्रार संजय राऊत यांनी PMLA कोर्टात ईडी विरोधात केली आहे. तर जिथे ठेवले जाते तिथे फक्त पंखा आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत. यावर राऊत राहत असलेल्या रूममध्ये एसी आहे असं उत्तर ईडीच्या वतीने देण्यात आलं आहे.

संजय राऊत यांना जामीन मिळणार की कोठडी? (Sanjay Raut Bail Or ED Custody) याचा देखील निर्णय आज लागण्याची शक्यता आहे.