TOD Marathi

मुंबई :

राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election Maharashtra ) भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा धनंजय महाडिकांच्या रूपाने भाजपने मिळवली. या विजयावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलेला शब्द मोडला, असा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केला होता. आता धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी एक ट्विट केलं आहे. ते ट्विट आता चर्चेत आहे.

या ट्विटमधून संभाजीराजे छत्रपती यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि विशेषतः शिवसेनेचे नेते, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही, अशी खरमरीत टीका संभाजीराजे छत्रपतींनी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्विट करत शकेली आहे.

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।

तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।। ,

असं संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

संभाजीराजे छत्रपती यांनी या ट्विटमध्ये शिवसेनेचा उल्लेख केला नसला तरी ट्विटचा रोख हा शिवसेनेकडे आहे. या ट्विटमधून शिवसेनाचा उल्लेख टाळत सेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीही संभाजीराजे छत्रपतींनी एक ट्विट केलं होतं. कोल्हापूरचाच खासदार होणार, याचा मला आनंद आहे, असं काल रात्री त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

 

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा केली होती तर शिवेसनेने त्यांना उमेदवारीसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. पण संभाजीराजे अपक्ष लढवण्यावर ठाम होते. यामुळे शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती.