मुंबई: साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केली आहे. झालेली घटना निंदनीय असून हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करुन आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.