TOD Marathi

नागपुर:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा कशा पद्धतीने होणार, यावर विद्यापीठाने आज अखेर शिक्कामोर्तब केलं आहे. आज नागपूर् विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक झाली. त्यात या परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबतचा निर्णय झाला. गेले कित्येक दिवस उन्हाळी परीक्षांच्या आयोजनाबाबत संभ्रमाचे वातावरण होते, त्यावर अखेर आज विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत. येत्या ८ जूनपासून परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत.

नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी हा निर्णय जाहीर केला. या परीक्षा विद्यापीठाच्या सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये अर्थात होम सेंटरवरच होणार आहेत. परीक्षेकरिता ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल. ९० मिनिटांमध्ये विचारलेल्या ५० प्रश्नांपैकी ४० प्रश्न सोडवायचे आहेत. ४० सोडवलेल्या प्रश्नांपैकी योग्य उत्तर असलेल्या प्रश्नांचे गुण ग्राह्य धरण्यात येतील. परीक्षेसंबंधीचे विस्तृत वेळापत्रक आणि अन्य माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर येत्या १ ते २ दिवसात जाहीर केले जाईल.