टिओडी मराठी, नाशिक, दि. 13 जुलै 2021 – भारतीय चलनी नोटा छापण्याच्या टांकसाळीतून सुमारे 5 लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याची घटना घडली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था असलेल्या करन्सी नोट प्रेसमधून ही चोरी झाली आहे, त्यामुळे या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासनाच्याही चिंता वाढल्या आहेत. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
एवढी सुरक्षा व्यवस्था असूनही पाच लाख रुपयांचा हिशोब लागत नाही. हे पैसे नेमके कुठे गेले? असा प्रश्न प्रशासनाला पडलाय. याप्रकरणी मुद्रणालय प्रशासकीय यंत्रणेसोबत पोलिसांनीही मौन बाळगलंय.
नाशिकमधील संबंधित करन्सी नोट प्रेसमध्ये भारतीय चलनी नोटांची छापाई करण्यात येते. याठिकाणी वर्षासाठी दोन ते अडीच हजार दशलक्ष किमतीच्या नोटा छापल्या जात असतात. त्यामुळे या कारखान्याला अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था दिली आहे.
देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर याचं कारखान्यामध्ये दिवसरात्र छापाई करून देशातील नागरिकांना नोटा पुरवल्या होत्या. आता याच मुद्रणालयात चोरीचा हा प्रकार घडला आहे.
छपाईच्या कारखान्यातून चलनी नोटा गायब झाल्याने मागील काही काळापासून गोपनीयरीत्या विभागीय चौकशी सुरू होती. पण, सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.
याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. ही घटना राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्याने संबंधित मुद्रणालय प्रशासन व पोलिसांनी मौन बाळगलंय.