मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे बादशाह अशोक सराफ आज त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा त्यांचा उत्साह अफाट आहे. सध्या ते रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ सिनेमाच्या चित्रीकरणात आहेत. अशोकमामांनी या सिनेमाला होकार का दिला ? त्या मागे काय कारण होतं याबद्दल त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
अशोक मामा म्हणाले की, ‘वेड चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहेत तेव्हा कोणताही मागचा पुढचा विचार न करता मी होकार दिला, कारण माझ्यासाठी रितेश दिग्दर्शक होतोय हे जास्त महत्वाचं होतं. रितेश एक गुणी कलाकार आहेच त्यामुळे तो दिग्दर्शन करताना मलाही काही नवीन शिकता येईल हा माझा हेतू होता आणि खरं सांगतो या सिनेमाचं चित्रीकरण मी खूप एन्जॉय केलं, धम्माल मजा केली.’
‘रितेश हा अतिशय थंड डोक्याने सेट वर काम करत होता कुठे ही त्याने अती राग, उत्साह दाखवला नाही. प्रत्येक सीनवर रितेशने विचारपूर्वक काम केलं. असे थंड डोक्याने काम करणारे फार कमी दिग्दर्शक आहेत आणि मला वाटतं रितेशच्या रूपाने आपल्याला नवीन दिग्दर्शक मिळाला आहे. वेड हा सिनेमा अतिशय उत्तम झालाय यात काहीच शंका नाही. आणखी एक बाब म्हणजे या सिनेमाद्वारे रितेशची बायको ज़ेनिलिया मराठीत पदार्पण करत आहे. तिने पण मराठी समजून घेऊन उत्तम काम केलंय. या सर्व अनुभवातून एकच सांगावसं वाटतं की माझ्या आयुष्यात एक चांगला सिनेमा केल्याचा आनंद मला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रितेश म्हणून मला एक चांगला मित्र भेटला असं मी म्हणेल. असंही अशोक सराफ म्हणाले आहेत.
आपण ज्यांचे चित्रपट पाहून वाढलो त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे नशीबच, "वेड"च्या निम्मिताने मिळालेली हि संधी अविस्मरणीय होती.
आज अशोक मामांचा ७५वा वाढदिवस, आपणास सुखी, समृद्धी आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. https://t.co/PSOTFwEaFB #ashoksaraf @mfc— Riteish Deshmukh (@Riteishd) June 4, 2022
रितेश देशमुख नेही अशोक सराफ यांच्यावर बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, ‘गेल्या २० वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतोय आणि अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. जेव्हा ‘वेड’ सिनेमाच्या लेखनाचं काम सुरु होतं तेव्हा कुठे तरी वाटत होतं की या सिनेमात अशोक मामांची भूमिका असावी म्हणजे जेणेकरून मामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होईल.’
या सिनेमाच्या निमित्ताने अशोक सराफ आणि रितेश देशमुख यांच्यामधील केमिस्ट्री दिसून आली आहे.