TOD Marathi

मुंबई:
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar is the new speaker of maharashtra assembly) निवडून आले आहेत. तर शिवसेनेच्या राजन साळवी (rajan salvi shivsena) यांचा पराभव झाला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते मिळाली तर राजन साळवी यांना केवळ 107 मते मिळाली. त्यामुळे नार्वेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले. या विजयानंतर भाजप (bjp) आमदारांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. तर विधानभवन परिसरात भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. शिवसेना आणि शिवसेना बंडखोरांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या संघर्षात बंडखोरांनी भाजपच्या साथीने पहिली लढाई जिंकली आहे. आता विश्वासदर्शक ठरावाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई आणि विधान परिषदेच्या सभापतीपदी सासरे बसलेले दिसणार आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil bjp proposed name of Rahul Narvekar) यांनी विधानसभा अध्यक्षपदासाटी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपेंकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पोल मागितला. त्यानंतर झिरवळ यांनी मतदान प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन त्यांचे नाव नोंदवून घेतले गेले आणि मतदान प्रक्रिया पार पडली.