काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात ‘भारत जोडो’ यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. कन्याकुमारी ते जम्मू (Kanyakumari to Jammu) असा यात्रेचा साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास असणार आहे आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. आतापर्यंत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात या यात्रेने 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. एका ठिकाणी राहुल गांधींची सभा सुरू असताना जोरदार पाऊस सुरू झाला आणि भर पावसातही राहुल गांधींनी सभा सुरूच ठेवली आणि सभा पूर्णही केली. राहुल गांधींची ही सभा आटोपल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसात झालेल्या सभांचे फोटो आणि व्हिडिओज राहुल गांधींच्या फोटो आणि व्हिडिओ सोबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
देशभरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
कर्नाटकात भाजपची सत्ता आहे, त्याच कर्नाटकात राहुल गांधींच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांनी रविवारी नंजनगुडमध्ये प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी म्हैसूरमधील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधितही केले. राहुल गांधी यांचे भाषण सुरु झाले आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्या पावसातही राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि आरएसएसवरही सडकून टीका केली. त्यांचं भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही सुरुच ठेवल्या होत्या.