टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 जुलै 2021 – जनतेने तीन पक्षांना बहुमत दिलं आहे. या बहुमताच्या आधारे हे सरकार काम करत आहे. मात्र, कधी याला तुरुंगात टाकतो तर कधी त्याला तुरुंगात टाकू अशा धमक्या द्यायच्या. आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या आणि मारामारी करण्याचे काम भाजप करत आहे. हे लोकशाहीला घातक असून ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी तालिका अध्यक्षांच्या केबिनमध्ये झालेल्या गोंधळाचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी घटना कधी घडली नाही. आणि विशेष म्हणजे, या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचे नेतृत्व करत होते, ही दुर्दैवी बाब आहे, असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
विधानसभेत ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून इम्पिरियल डाटा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावावर विरोधी पक्षाने हरकत उपस्थित केली.
त्यामुळे पीठासीन अधिकार्यांनी बोलण्याची संधी दिली. त्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुद्देसूद जो घटनाक्रम होता, त्याची माहिती दिली.
त्यावेळी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मतासाठी टाकल्यानंतर भाजपचे बरेच आमदार पीठासीन अधिकार्यांच्या टेबलकडे धावले. त्यांचा माईक उचलला, राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.
या शिवाय धक्काबुक्कीही केली. यापेक्षा भयानक म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा माईक आणि स्पीकर फोडला, असेही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
चेंबरमध्ये अध्यक्षांना आमदारांनी घेरलं :
अध्यक्षांच्या चेंबरमध्ये अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन भाजपच्या सगळ्या आमदारांनी त्यांना घेरलं. धक्काबुक्की केली आणि आई-बहिणीवरुन शिवीगाळही केली, अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडली नव्हती, असे मलिक म्हणाले.
भाजपवाल्यांना आता गुंडगिरी करून विधानसभेचे कामकाज थांबवायचे असेल तर ते आघाडी सरकार कधीही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजपला इशारा दिला आहे.
This is how it all started. BJP leaders stormed into #Maharashtra #Assembly #Speakers #Chamber. During first day of Assembly session pic.twitter.com/Z2NjIjwckv
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 5, 2021