टिओडी मराठी, पुणे, दि. 17 मे 2021 – कोरोनाची सध्या दुसरी लाट सुरु असून या लाटेत अनेकांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना एका स्टेजला ऑक्सिजनची आवश्यकता भासतेच. त्यामुळे आता महापालिकेने स्वतःच्या रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. महापालिकेचे 2 प्रकल्प सुरू झाले असून एकूण 12 प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. त्याद्वारे ऑक्सिजन निर्मितीची क्षमता प्रति मिनिट १०.५८३ लिटर म्हणजे दिवसाला २० टन इतकी होणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
सध्या एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या अद्यापही कायम आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी कमी झालेली नाही. तसेच महापालिकेला तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केलीय. ऑक्सिजन कमी पडून आणीबाणीची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने ऑक्सिजन निर्मितीवर भर दिलाय, असेहि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
महापालिकेच्या मध्यम आणि मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसविण्याचे काम सुरू झालंय. ८ रुग्णालयात १२ प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. यासाठीचे आवश्यक सामग्री अमेरिका, फ्रांस आणि नेदरलँड येथून मागविली आहे.
हे सर्व प्रकल्पांतून १०५८३ लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्माण होणार आहे. महापालिकेकडे सध्या ४० टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा करणेसाठी एकूण ७ टँक बसविले आहेत’, ऑक्सिजन निर्मितीत पालिकेची ही वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरूय, असे मोहोळ यांनी सांगितले.