टिओडी मराठी, पणजी, दि. 6 सप्टेंबर 2021 – गोवा राज्याच्या विकासामध्ये परप्रांतीयांचेही योगदान महत्त्वाचे ठरले आहे. सरकार नेहमीच उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. यापुढील काळामध्येही त्यांना मान-सन्मान मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहामध्ये आयोजित उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, संघटनमंत्री सतीश धोंड, संघटक राकेश चक्रवाल, गजेंद्रसिंग रजपूत आदी उपस्थित होते.
नव्या भारताची निर्मिती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. ते साकार करण्यासाठी सर्व प्रांतातील नागरीकांनी एकत्र येण्याची आवश्यक आहे. गोव्यातील परप्रांतीय जनतेच्या समस्या सोडविण्यात भाजपचे सरकार कोणतीही कसर सोडणार नाही.
केंद्राच्या योजनांचा स्थानिकांसह सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. यावेळी उत्तर भारतीयांच्या वतीने सावंत, तानवडे आणि धोंड यांचा सत्कार केला.
गोवा राज्यातील सर्वच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यामध्ये येत्या आठ दिवसांत सार्वजनिक तक्रार निवारण केंद्र सुरू करणार आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. त्यासाठीचे फलक प्रत्येक रस्त्यावर लागतील.
त्यावरील क्रमांकावर तक्रारींची नोंद करता येणार आहे. गोव्यातील परप्रांतीय नव्हे, तर पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. ती व्यवस्थितपणे पार पाडली जाणार आहे, असे ते म्हणाले.