TOD Marathi

नवी दिल्ली:
निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. १८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी १५ जून ते २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे तर २ जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत संसदेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार मतदान करतात. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होणार आहे. सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.