टिओडी मराठी, पुणे, दि. 23 जून 2021 – प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे पुणे महापालिकेत कार्यरत असताना पीएमपीएमएलच्या ठेकदारांकडून दंड वसूल केला होता. दंडाची रक्कम 14 कोटी रुपये असून तो दंड आता परत देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे.
आज पुणे महापालिकेत विद्यमान सीएमडी राजेंद्र जगताप यांना याबद्दल प्रस्ताव मांडला होता. महालक्ष्मी ट्रान्सपोर्टला जो दंड सुनावला होता. परत देण्यात यावा, अशी माणगी महापालिकेकडे केली होती. या प्रस्तावाला आज मान्यता दिली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला आता महापालिका 14 कोटी रुपये परत देणार आहे.
विशेष म्हणजे, महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक सातव हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
तुकाराम मुंढे हे पीएमपीएमएल मुख्य संचालक असताना त्यांनी त्या ठेकेदारावर कारवाई केली होती. महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या बसेस पीएमपीकडे भाड्याने आहेत. महालक्ष्मी ट्रान्सपोर्टने कराराच्या अटी व शर्थीचं उल्लंघन केलं होतं. अटी शर्थीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड वसूल केला होता.
2017 मध्ये तुकाराम मुंढे यांनी पीएमपीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले होते. यात एखाद्या स्टॉपवर गाडी न थांबल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही केली होती.
तसेच जर चालकाकडून एखादी चूक झाली किंवा त्याने सिग्नल तोडला तर त्याच्या पगारातून 100 रुपये दंड कापण्याचे ठरविण्यात आला होता.
एवढंच नव्हे तर कामचुकार कामगारांना त्यांनी घरचा रस्ता सुद्धा दाखवला होता. तसेच ठेकेदारांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे विरोधक व सत्ताधाऱ्यांनी एकत्र येत तुकाराम मुंढे यांची बदली करण्याची मागणी केली होती, त्यात त्यांना यश आले होते. तुकाराम मुंढेंची पुण्यातून बदली झाल्यानंतर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय रद्द केले होते.