भारतील नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. भारतीय नौदलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. केरळ येथे पहिल्या स्वदेशी कोची शिपयार्ड लिमिटेड येथे भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा दिमाखदार सोहळा पार पडला. याच वेळी पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नवीन झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. भारतीय नौदलाच्या नव्यानं अनावरण करण्यात आलेल्या ध्वजावर एका बाजूला डाव्या कोपऱ्यात भारताचा राष्ट्रध्वज आहे तर त्याच्या बाजूला भारतीय नौदलाचं चिन्ह आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. शिवरायांच्या राजमुद्रेपासून नौदलाच्या नव्या झेंड्यासाठी प्रेरणा घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आरमार दलाचा उल्लेख केला की, ‘भारतीय नौदलाचा ध्वज शिवरायांनी समर्पित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं. शिवरायांनी नौदलाचा विकास केला. भारतीनं आज गुलामगिरीची निशाणी उतरवली.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करत म्हटलं आहे की, भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवलं आहे. याचं कारण म्हणजे याआधीच्य भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि श नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो’ असा आहे.
भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे. देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका (India Made Aircraft Carrier) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे हा सोहळा पार पडला. त्यानंतर आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत सामील झाली आहे.
पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे. हे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.