TOD Marathi

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडत भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर गटाने भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. (Eknath Shinde group MLA and BJP forms the government) राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं मानलं जात होतं. मात्र भाजप नेतृत्वाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत फडणवीस यांच्या ऐवजी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद दिलं. या सर्व घडामोडींविषयी आता स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. (Ekanath Shinde spoke on formation of government)

भाजप नेतृत्वाचा निर्णय तुमच्यासाठीही धक्कादायक होता का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘भाजप सत्तेसाठी काहीही करते, असा लोकांचा दृष्टीकोन होता. मात्र आम्ही ५० आमदारांनी हिंदुत्वाची आणि विकासाची भूमिका घेतल्यानंतर भाजपने मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देत संपूर्ण देशवासियांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आहे.’ एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका मांडली आहे.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी असताना शिवसेनेच्याच आमदारांनी केलेला बंड देशभर चर्चेचा विषय ठरला. या बंडाबाबत एकनाथ शिंदे यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आम्ही भाजपसोबत सरकार बनवून काहीही चुक केलेलं नाही. २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे आम्हाला हिंदुत्वाबद्दल, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भूमिका घेता येत नव्हती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासंबंधीही आम्ही उघडपणे भूमिका घेऊ शकत नव्हतो,’ असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीत ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व आम्ही केल्या आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचा विजय झाला आहे, बहुमत चाचणीतही आम्ही विजयी झालो. १७० आमदारांचं बहुमत असणारं हे सरकार आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.