डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. नुकताच ‘पंचक’चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.
घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे बघताना मजा येणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाबद्दल डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ” यापूर्वीही आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली होती, जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. ‘पंचक’ हा आमचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट आहे. ‘पंचक’ खरंतर सर्वार्थानेच खास आहे. या चित्रपटात अनेक मात्तबर कलाकार आहेत. कथा उत्तम आहे. प्रेक्षकांना आपल्या आसपास घडणाऱ्या घटना चित्रपटरूपात पाहायला अधिक आवडतात. ‘पंचक’ हा त्यापैकीच एक आहे. ही एक विचित्र स्थिती आहे, परंतु अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने ती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. हा एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे, जो प्रत्येकाने एकत्र पाहावा असा आहे.’’
चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘’श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही फक्त एक निखळ मनोरंजन करणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे. चार्ली चॅप्लिनच्या म्हणण्यानुसार ‘लाईफ इज अ ट्रजिडी इन क्लोज अप, बट अ कॅामेडी इन लाँग शॅाट, हा चित्रपट अगदी तसाच आहे. जेव्हा आम्ही तो लिहिला तेव्हा त्या पात्रांसाठी ती भीती होती परंतु प्रेक्षकांसाठी ही धमाल आहे. तर दिग्दर्शक जयंत जठार म्हणतात, ‘’खरं सांगायचे तर ही कथा माझ्या आयुष्यात घडली होती. सुरूवातीला खूप भीती वाटायची. परंतु कालांतराने त्याची मी मजा घ्यायला लागलो आणि त्यातूनच मला हा विषय सुचला. आता हा कल्लोळ पाहाताना प्रेक्षकांनाही मजा येणार आहे. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणातच मला माधुरी दिक्षित नेने आणि डॅा, श्रीराम नेने यांच्यासारखे निर्माते लाभले, यातच सगळे आले. या चित्रपटात अतिशय नामवंत कलाकार आहेत. त्यामुळे कागदावरील हा ‘पंचक’ आता लवकरच पडद्यावर झळकणार आहे.’’