TOD Marathi

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आम्ही जात पडताळणी समितीसमोर देणार आहोत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. समीर वानखेडेंच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट दाखवलं जात आहे. वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट दाखवण्यापेक्षा समीर यांनी त्यांचं स्वत:चं सर्टिफिकेट दाखवावं, असं आव्हानच नवाब मलिक यांनी केलं आहे.

वानखेडेच्या बहिणीचं सर्टिफिकेट इंटरनेटवर आहे. पण समीर वानखेडेचं नाही. आम्ही खूप शोधल्यानंतर आम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं. ज्ञानेश्वर वानखेडे जन्माने दलित आहेत. त्यांनी दलित असल्याचं सर्टिफिकेट घेतलं. नोकरी मिळवली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि धर्मांतर केलं. त्यानंतर ते आयुष्यभर मुस्लिम म्हणून जगले, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

मी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे तर तुमचं खरं सर्टिफिकेट जाहीर करा. वडिलांचं सर्टिफिकेट दाखवलं जात आहे. पण वानखेडेंनी त्यांचं सर्टिफिकेट दाखल करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता हे आर्यन खान ड्रग्स प्रकरणापासून सुरू झालं आणि आता यातून अनेक पैलू बाहेर निघत आहेत. यातून नेमका निकाल कोणाचा लागतो त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.