टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 ऑगस्ट 2021 – कोरोनाचे संकट पूर्णतः संपले नसतानाच जगापुढे मारबर्ग विषाणूचे संकट उभे राहिले आहे. हा विषाणू कोरोना, इबोलापेक्षाही भयानक संसर्गजन्य आणि जीवघेणा आहे. दक्षिण आफ्रिकन देश गिनीमध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. संसर्ग झाल्यानंतर आठ दिवसांत रुग्णाचा मृत्यू होत आहे, अशी धक्कादायक माहिती मिळत आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सावधगिरीचा इशारा दिलाय.
मारबर्ग विषाणू वटवाघळांपासून फैलावतो आणि त्याचा मृत्यूदर 88 टक्क्यांपर्यंत आहे, असे डब्ल्यूएचओने सांगितलं आहे. 2 ऑगस्टला दक्षिण गुएकेडाऊ प्रांतात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला त्याला इबोला झाल्याचा संशय होता, मात्र पोस्टमॉर्टम नंतरच्या नमुन्यांमध्ये त्याच्या शरीरात मारबर्गचा अत्यंत घातक संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.
हा मारबर्ग विषाणू झपाटय़ाने खूप अंतरापर्यंत पसरू शकतो. त्यामुळे प्रसाराअगोदर त्याच्या संसर्गाच्या वाटा रोखणे गरजेचं आहे, असे नमूद करीत आफ्रिकेतील डब्ल्यूएचओचे विभागीय संचालक डॉ. मात्शीदिसो मोएतो यांनी या विषाणूबाबत सतर्कतेचा इशारा दिलाय. डब्ल्यूएचओने दोन महिन्यांपूर्वी गिनी देशातील इबोलाचा संसर्ग संपल्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच मारबर्ग विषाणूने डोके वर काढले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.
8 दिवसांत मृत्यूची भीती –
मारबर्ग विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दुसऱ्या दिवसापासून 21 दिवसांपर्यंत दिसतात. रुग्णाला तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी आणि गंभीर अस्वस्थतेचा त्रास अचानक सुरू होतो. तापासह गंभीर रक्तस्रावाचा त्रास होतो. त्यामुळे रुग्णाच्या जिवाला धोका आहे.
संसर्गानंतर सात दिवसांत शरीराच्या विविध भागांतून गंभीर रक्तस्राव होतो. शौच, उलटीतून रक्त जाते. त्यामुळे आठ ते नऊ दिवसांच्या आत मृत्यू होण्याचा धोका संभवतो. इतर लक्षणांमध्ये अंगदुखी, पोटदुखी, उलटी-मळमळ, सुस्ती, धूसर दिसणे यांचा समावेश होत आहे.
मारबर्गचा संसर्ग असा वाढतो –
वटवाघळांच्या संपर्कात आल्यामुळे मनुष्यामध्ये मारबर्ग विषाणूचा शिरकाव होऊ शकतो. जर एक व्यक्ती या विषाणूने बाधित झाली की, त्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या अनेकांना संसर्ग होतो.
याचा संक्रमण दर कोरोना आणि इबोलापेक्षाही अधिक आहे. संक्रमित लोकांचे रक्त किंवा त्यांच्या अन्य अवयवांपासून हा विषाणू फैलावण्याचा धोका संभवत आहे.