TOD Marathi

नवी दिल्लीः 
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. यातच आता पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे देखील आज अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मल्लिकार्जुन खरगेंच्या एन्ट्रीमुळं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh might take back from Congress President Election) माघार घेणार असल्याचंही बोललं जात आहे. खरगे हे गांधी कुटुंबाचे निष्ठावान आणि जवळचे मानले जातात. विविध पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. (Congress presidential election)

यापूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्यांना गांधी कुटुंबाचे समर्थन लाभण्याची शक्यता नसल्यामुळे मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, अंबिका सोनी, मीराकुमार, सुशीलकुमार शिंदे यांची नावे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चर्चेत आली आहेत. (Mukul Wasnik, K C Venugopal) त्यामुळे गांधी कुटुंबाकडून खरगे किंवा अन्य कोणत्याही निष्ठावंताचे नाव समोर आल्यास दिग्विजय सिंह मैदानातून माघार घेणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, गांधी कुटुंबाच्या उमेदवाराविरुद्ध दिग्विजय सिंह यांनी माघार न घेतल्यास गांधी कुटुंबाचे सारेच डावपेच अंगलट येतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांच्या माघारीनंतर आता गांधी कुटुंब मल्लिकार्जून खरगे (Senior Congress leader Mallikarjun Kharge) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचीही शक्यता आहे. त्यांनी नुकतीच सोनिया गांधींची भेट घेतली आहे. त्यामुळं अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतचा निर्णय सोनिया गांधी घेणार असल्याची माहिती आहे. खरगे यांनी आजच दिग्विजय सिंह यांचीही भेट घेतली आहे. २०१४ मध्ये खरगे यांना लोकसभेत पक्षाचा नेता बनवण्यात आलं होतं. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवानंतरही त्यांना २०२०मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं.