राज्य सरकारकडून (Maharashtra State Government) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, उठसूठ आरक्षण वाटली जातात असं म्हणत राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (Nationalist Yuvati Congress) वतीने फर्ग्युसन कॉलेज रोड येथे “जाहीर निषेध आंदोलन” घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी “गोविंदा” ना शासकीय नोकरीत आरक्षणाची घोषणा केली आहे. दहीहंडीला (Dahihandi) अगोदर साचेबद्ध पद्धतीने क्रीडाप्रकारात आणणे, त्यानंतर गोविंदा खेळाडूचे प्रमाण ठरवणे, खेळाला आणि खेळाडूला कागदोपत्री दर्जा प्राप्त करून देणे यासारख्या अनेक गरजेच्या बाबी यात आहेत , असे असताना अविचारीपणाने अशा घोषणा करणे म्हणजे वर्षानुवर्ष या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांवर अन्यायकारक असे आहे, असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.
अगोदरच पदोन्नतीचं, ओबीसीचं, मराठा , मुस्लिम वर्गाचं आरक्षण हे विषय प्रलंबितच आहेत. त्यात केवळ दिखाऊपणा म्हणून अशा घोषणा करत विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे असं म्हणत या आंदोलनात विद्यार्थ्यांनी गोट्या,भवरा, असे खेळत आरक्षणाची मागणी केली तर मंगळागौर खेळणाऱ्या स्त्रियांनी व डोंबाऱ्याचा खेळ खेळणाऱ्या कुटुंबाने देखील नोकरीत आरक्षण मिळावे अशी मागणी केली .
या आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे पुणे शहर (NCP Pune) अध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, युवती सेलच्या अध्यक्षा सुष्मा सातपुते, माजी नगरसेविका सायली वांजळे, प्रवक्ते प्रदीप देशमुख, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.