TOD Marathi

मुंबई : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ(Eknath Shinde) शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचं समजतंय. या माध्यमातून स्वपक्षाचा फायदा करून घेण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसनं(Nationalist Congress Party) खास रणनीती आखलीय.

शिवसेना सोडल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात बंडखोर आमदारांविषयी काहीशी नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. याचाच फायदा उठवत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलेत.

पक्षांतर करणे लोकांना आवडत नाही, त्यातच काही ‘आमिष’ घेऊन गेले असतील तर जनतेला ते अजिबात पसंत पडत नाही, त्याविरुद्ध जनतेत चीड निर्माण होते. त्यामुळे शिवसेनेतून पक्षांतर करून काही आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी पक्षांतर कशासाठी केले आहे, त्याचीही सुरु चर्चा आहे. हाच मुद्दा धरुन बंडखोर आमदारांविरोधात रान उठवा. जनतेच्या मनात पक्षांतराबद्दल जागृती निर्माण करा. यामुळे जनतेत त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण होईल व जनता त्यांना स्वीकारणार नाही. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी या गोष्टीचा फायदा होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.