TOD Marathi

अहमदनगर :
आमदार रोहित पवार यांनी काल केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. २०२४ च्या निवडणुकीनंतर राजकारणाची सूत्रे आपल्या हातात असतील, असं रोहित पवार यांनी म्हटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र या चर्चेबाबत आता स्वत: रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढल्याचं म्हटलं आहे.

‘अनियंत्रित सत्ता, केंद्रीय यंत्रणा, दडपशाही यांसारख्या विविध मार्गांनी लोकशाहीवर परिणामी संविधानावर आघात होत आहे. अशा परीस्थितीत लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर आहे. युवावर्गाच्या सक्रिय सहभागाशिवाय लोकशाहीविरोधी शक्तींचा पराभव शक्य नाही. आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते युवांना राजकारणात येण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. त्यादृष्टीनेच मी काल युवांना सक्रिय राजकारणात येण्याचं आवाहन करताना येणारा काळ हा युवांचा असेल, असं म्हणालो. परंतु या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला तर किती मोठी बातमी होते, याचा प्रत्यय काल आला,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

सोबतच अनेकदा लोकहिताची कामं करताना ती लोकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं, पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली जातेच असं नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी माध्यमांबाबत आपली नाराजीही व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणार की काय, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर रोहित पवारांनी याबाबत आपली बाजू मांडली आहे. ‘मी कोणत्याही पक्षातील पदांबाबत बोललो नाही. पण लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवक म्हणून युवांनी केवळ चांगल्या विचारांच्या लोकांनाच निवडून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. शिवाय सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्या सरकारला युवांकडं दुर्लक्ष करता येणार नाही तर सशक्त युवा धोरण आखून ते राबवावं लागणार आहे. या माध्यमातून येणारा काळ आपला म्हणजेच लोकशाही विचारांचा आणि युवांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणारा असेल, यात शंका नाही,’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.