TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 4 सप्टेंबर 2021 – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.

ईडीने एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावलाय.

शुक्रवारी याप्रकरणी अटकेमध्ये असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एप्रिल 2017 मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज आरोपपत्र दाखल केलं आहे.

मागील आठवड्यात ईडीने एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली. एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 4 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आणि बँकेतील 86 लाख 28 हजार रुपये असा या कारवाईचा तपशील आहे.