अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची (Akhil Bhartiya Marathi Sahitya Mahamandal meeting at Wardha) वर्ध्यात स्वाध्याय मंदिर येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgavkar) यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्यात यावे असे विदर्भ साहित्य संघाने सुचविले होते. त्या अनुषंगाने 96 वे महामंडळाच्या स्थळ निवड समितीने वर्ध्याला भेट दिली, तिथलं मैदान आणि वाहन तळची पाहणी केली. ती योग्य असल्याचे पाहून स्थळ निवड समितीने वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली. त्यानुसार अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्याचे निश्चित केले आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मंगळवारी प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. यात विविध घटक संस्थांकडून प्राप्त झालेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. त्यातून न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश द. वंसकर, विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे व कार्यकारिणी सदस्य तसेच, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे आदी उपस्थित होते.
96 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर होत आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी दत्ता मेघे (Datta Meghe) यांनी स्वीकारली असून संरक्षपदाची जबाबदारी सागर मेघे यांनी सांभाळली आहे. या साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) हे आहेत. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे.