नागपूर :
जवळपास 3 महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर घडवून भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. (BJP on backfoot in Nagpur rural politics) मात्र, भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने तब्बल ९ जागांवर विजय मिळवलं आहे तर भाजपला मात्र खातंही उघडता आलं नाही.
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. (Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule are in Nagpur) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील याच नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. भाजपचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील हेवीवेट नेते नागपूर जिल्ह्यातून येतात आणि याच जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने मोठी चर्चा रंगत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात काटोल आणि नरखेड या तालुक्यांतील सभापतीपद राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. सोबतच हिंगणा तालुक्यातील सभापतीपद निवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. एका तालुक्याचं सभापतीपद मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हा पक्ष यशस्वी ठरला आहे. या पक्षाचे रामटेकचे आमदार आशिष जैसवाल यांनी तालुक्यातील सभापतीपद आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे खेचून आणलं आहे.
नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ २ तालुक्यांमध्ये उपसभापतीपदावर समाधान मानवं लागलं आहे. भारतीय जनता पक्षातील दिग्गज नेते ज्या नागपूर जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यात सभापतीपद निवडणुकीत भाजपची दारूण अवस्था झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.