TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 4 सप्टेंबर 2021 – एका युट्यूब चॅनेलच्या दिग्दर्शकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे एक किलो गांजा (मनाली चरस) त्याच्याकडे सापडला आहे. त्याची एकूण किंमत ५० लाख इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

४३ वर्षीय गौतम दत्ताला मुंबई क्राइम ब्रांचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत अटक केली आहे. ही अटकेची कारवाई अंधेरीमध्ये केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिलीय.

जुहू-वर्सोवा लिंक रोडवर गौतम दत्ता वास्तव्यास आहे. तो एक युट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनेलचा तोच दिग्दर्शकही आहे. बॉलिवूडशी त्याचे संबंध असून अनेकांना अंमली पदार्थ पुरवत आहे, असा संशय असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी (अंमलीपदार्थ विरोधी पथक) दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जुहू-वर्सोवा लिंक रोडवर गस्त घालत असताना संशय आल्यामुळे गौतम दत्ताला अटक केली आहे.

गौतम दत्ताची तपासणी केली असता यावेळी त्याच्याकडे ५० लाख किंमतीचा एक किलो गांजा सापडला, असे दत्ता नलावडे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.