TOD Marathi

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होत आहे. (MLC Election 2022 Maharashtra) राज्यसभेच्या निवडणुकीत प्रमाणेच विधानपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार अशी चिन्हं दिसत आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप हे दुर्धर आजाराशी संघर्ष करत असतानाही राज्यसभा निवडणुकीत मतदानाला दाखल झाले होते. काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही आमदारांना विश्रांतीचा सल्ला दिला होता मात्र पक्षाला आपली गरज आहे, आपण मतदानाला येणारच अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि आमदार मुक्ता टिळक सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाल्या. (MLA Mukta Tilak and MLA Laxman Jagtap will vote in MLC Election)

विधानपरिषदेसाठी मतदान पार पडत आहे. सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. भाजपने (BJP) देखील आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळण्यासाठी मी मुंबईला जात असल्याचं मुक्ता टिळक म्हणाल्या आहेत.

मुक्ता टिळक या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही मुक्ता टिळक या मुंबईला मतदानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचा विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता. तर, खासदार अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी देखील आपला विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता.