शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्का असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया देत शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत गंभीर आरोप केले आहेत. (MLA Nitin Deshmukh alleges BJP and Shinde group )
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचं (Shivsena party symbol freezed by EC) पाप भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने केलं. आधीपासून यासाठी प्रयत्न सुरू होते ही लोकं जनतेसमोर वेगळी मांडणी करतात आणि यांचं कटकारस्थान वेगळं असतं. पक्षाचं चिन्ह गोठवलं जावं यासाठी सुरुवातीपासूनच यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. भारतीय जनता पक्ष रामाच्या नावावर या देशात राजकारण करते आणि बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) शिवसेनेची स्थापना केली तेव्हा शिवाजी महाराजांचं शिव आणि रामाचा धनुष्यबाण ही कल्पना बाळासाहेबांनी मांडली. पण रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टींनं रामाचं धनुष्यबाण गोठवण्याचं महापाप केलं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला या देशात रामाच्या नावानं मतं मागण्याचा अधिकार नाही.
ठाकरे घराण्यावर या देशातील शिवसैनिकांची निष्ठा आहे, चिन्ह गोठलं म्हणून आम्ही खचून जाणार नाही, उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि येणाऱ्या निवडणुकांमध्येही आम्ही हे दाखवून देऊ, असंही ते म्हणाले. या आधीही दसरा मेळाव्यात आमदार नितीन देशमुख यांनी त्यांना कशा पद्धतीने शिंदे गटाने सुरतला नेलं होतं? त्यानंतर ते कशे परत आले होते? याबद्दल सांगितलं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा नितीन देशमुख यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला आहे आणि उमेदवार दिला असताना निवडणुकीत धनुष्यबाणाव्यतिरिक्त वेगळे चिन्ह घ्यावं लागणार आहे. शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवार दिला नाही, त्यामुळे अंधेरी निवडणुकीपर्यंत तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे आता सोमवारी या संदर्भात काय घडामोडी घडतात, हे बघणं औत्सुकत्याचं ठरणार आहे.