राज्यात आधीच विविध वक्तव्यावरून वातावरण तापलेलं असताना मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलंय. ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच एकनाथ शिंदे यांची सुटका झाली, असं वक्तव्य त्यांनी केलं. किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. हे वक्तव्य करताना अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला त्यांनी औरंगजेबाची उपमा दिली.
यावरून आता विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया काय?
“भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं हे वक्तव्य चुकून आलेलं आहे किंवा भाषणाच्या ओघात त्यांनी अशी तुलना केली, असं मी मानत नाही. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपचा हा एक प्लॅन आहे. महाराजांचा अपमान हा भारतीय जनता पक्षाचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार तोफ डागली.
अमोल मिटकरींची प्रतिक्रिया काय?
“मंगलप्रभात लोढा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा काही संबंध असेल, असं मला वाटत नाही. त्यांच्याकडे जरी पर्यटन खातं असलं तरी त्यांना शिवरायांच्या इतिहासाबाबत कितपत माहिती आहे? हा अभ्यासाचा विषय आहे. त्यांना इतिहासाची जाण असेल किंवा त्याची बुद्धी असेल, असं मला वाटत नाही. शिवरायांनी बादशाहच्या हातावर तुरी दिल्या अन् आपली सुटका करुन घेतली, हे महाराजांचं कौशल्य होतं. महाराजांनी गद्दारी केली नव्हती. महाराजांनी स्वराज्य वाचविण्यासाठी केलेलं ते नियोजन होतं. या घटनेची तुलना शिंदेंच्या बंडाशी करणार असाल तर हे बुद्धी नसल्याचं लक्षण आहे”, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
मंगलप्रभात लोढा नक्की काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी
बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना आणि मविआमधून) बाहेर पडले”, असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मविआची तुलना औरंगजेबाशी केली.