काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकी (Election of Congress President) संदर्भात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग (Digvijaya Singh) यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता शशी थरूर (Shashi Tharoor) विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) अशा स्वरूपाची ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दिग्विजय सिंग (Digvijaya Singh) यांची देखील भेट घेतली होती. काल शशी थरूर यांनी एक फोटो ट्विट केला होता ज्या फोटोमध्ये शशी थरूर यांच्यासह दिग्विजय सिंग होते. या दोघांच्या भेटीतला हा फोटो होता. आणि या फोटोला शेअर करत असताना ही अतिशय मैत्रीपूर्ण लढत असणार आहे, ही एक प्रक्रिया असणार आहे. असं म्हणत शशी थरूर यांनी पक्षात सगळं आलबेल आहे आणि आम्ही प्रत्यक्ष एकमेकांच्या विरुद्ध उमेदवार असलो तरी विरोधक नाही अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं होतं.
मात्र, आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एन्ट्रीमुळे दिग्विजय सिंग (Digvijaya Singh) यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. आज दिवसभरात आणखी कोणता उमेदवार अर्ज दाखल करतो का? हे बघावे लागणार आहे. मात्र, जवळपास ही निवडणूक आता मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरूर अशीच होणार हे स्पष्ट झालं आहे. दिग्विजय सिंग यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. उलट मीच त्यांचा सुचक असेल, मला आधी कल्पना असती तर मी अर्जही दाखल केला नसता, असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांनी एकप्रकारे पाठिंबा दर्शवला.