TOD Marathi

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्र्यांच्या कारभारावर आरोप करत भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्याच बरोबर किरीट सोमय्यांनी आता ३१ डिसेंबरला ४० नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे.

३१ डिसेंबर पर्यंत ४० चोरांचे घोटाळे काढून १ जानेवारीला महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करणार आहे. दिवाळी आज आहे पण पाडवा मात्र 1 जानेवारीला असेल, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. दिवाळीच्या दिवशी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केलं त्याच सोबत त्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुकही यावेळी केले.

यापूर्वी किरीट सोमय्यांनी राज्यातील अनेक नेत्यांवर आरोप केले त्यांच्यावर ईडी, आयकर विभागाचे छापेमारीही झाली. भावना गवळी, अनिल देशमुख, हसन मुश्रिफ, अजित पवार, बजरंग खरमाटे, अशा अनेक नेत्यांवर आरोप केले. आता आणखी ४० नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा दावा केला आहे.