टिओडी मराठी, पुणे, दि. 5 सप्टेंबर 2021 – महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागांत येत्या आठवड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
येत्या 48 तासांसाठी बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो’ तर, दि. 6 आणि 7 सप्टेंबरदरम्यान 16 जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. याकाळात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
सध्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरामध्ये समुद्रसपाटीपासून 4.5 किमी उंचीवर हवेची चक्रिय स्थिती तयार झालीय. या प्रभावामुळे येत्या 48 तासांत दक्षिण-पूर्व उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तविली आहे.
तर, दक्षिण छत्तीसगड आणि आसपासच्या भागात हवेची चक्रिय स्थिती कार्यरत आहे. अरबी समुद्रामध्ये उत्तरेकडे सौराष्ट्रापर्यंत कार्यरत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा जोर वाढलाय. परिणामी, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ भागातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.