गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना ९ जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची ही लागण झाली होती. ३० जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे.
लतादीदींना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी, उत्तम स्वास्थ्यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखले जाते. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी केली होती त्यात त्या पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात ‘प्रभू कुंज’ जवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सद्यस्थितीला लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले आहे.