टिओडी मराठी, दि. 5 जुलै 2021 – संयुक्त अरब अमिरातमध्ये ३७ वर्षांची भारतीय वंशाच्या व्यक्तीने दोन कोटी दिरहमची (सुमारे ४० कोटी रुपये) लॉटरी जिंकलीय. या बक्षीसामध्ये एकूण १० जणांचा वाटा असून इतर ९ जण विविध देशांत वास्तव्यास आहेत, असे संबंधिताने माहिती दिली आहे.
मूळचे केरळचे रहिवासी असलेल्या रंजीत सोमराजन यांना ४० कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. सोमराजन हे अबूधाबीमध्ये चालक म्हणून काम करत आहेत.
मागील ३ वर्षांपासून ते लॉटरीची तिकिटं खरेदी करत होते. अखेर त्यांचं नशीब उघडलं आणि त्यांना मोठा जॅकपॉट लागला. याबाबतच वृत्त तेथील खलीज टाईम्सने दिलं आहे.
याबाबत सोमराजन म्हणाले, जॅकपॉट लागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. दुसरा किंवा तिसरा क्रमांक येईल, अशी मला आशा होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस अनुक्रमे ३० लाख दिरहम आणि १० लाख दिरहम होती.
मी २००८ पासून अबूधाबीमध्ये आहे. दुबई टॅक्सी आणि विविध कंपन्यांत मी चालक म्हणून काम केलंय. मागील वर्षभरापासून एका कंपनीत ड्रायव्हर-कम-सेल्समन म्हणून मी कार्यरत आहे.
पगार कपातीमुळे आयुष्यातील समस्या वाढल्या आहेत. मात्र, आता जॅकपॉट जिंकल्याने आनंदी आहे, असे सोमराजन यांनी सांगितलं आहे.